फार पुर्वी कुणी तरी म्हटलंय, “ह्रदयाचा मार्ग पोटातून जातो”. ते काही उगीच नाही. किती तरी जणांच्या उमलत्या प्रेमाची साक्षीदार म्हणुन काॅफी वर्षानुवर्ष मिरवतेय. काॅफीच्या टेबल वरुन सुरु झालेल्या प्रेमाची गोष्ट कांदेपोह्यांना वळसा घालुन लग्नाच्या पंगती पर्यंत कशी जाऊन पोहोचते याचे किस्से फारच भन्नाट आहेत. लग्ना नंतर नव्या नवरीने पहिल्यांदाच केलेला पदार्थ कितीही चुकला तरी गोड मानून घेणारे खरे खवय्ये असले पाहिजेत. हा हि प्रवास, "बाई ग किती मीठ घालते आमची सुनबाई जेवणात" अश्या तक्रारींपर्यंत पोहोचतोच. पुरणपोळीच्या सोबतीला तुप हवचं हा अलिखित नियम आहे. तुपाशिवाय आलेल्या पोळीला खव्वय्यांची मान्यता नाही असं म्हटलं तर त्यात वावगं वाटण्या सारखं काहीच नाही. काही जोड्या अशाच तयार होतात, आणि मुळात ती जोडी आहे हेच आपल्याला विसरायला होतं. तसा उसळ आणि शेव चिवडा यांचा दूर दूर पर्यंत संबंध नव्हता पण त्यांचं सुत जुळलं आणि मिसळ तयार झाली. अगदी अनभिज्ञ दोघांनी असं एकत्र यावं आणि लोकांना वेड लावावं. प्रेम प्रेम म्हणजे या पेक्षा काय वेगळं असेल?
धो धो कोसळणाऱ्या पावसात गरम गरम वडापाव आणि वाफाळता चहा याच्या पलिकडे दुसरं सुख नाही असं ठामपणे सांगणारे नमुने पावलो पावली सापडतात. जिभेला प्रचंड धार असणारे पण दोन मसाल्यांमधला फरक न सांगु शकणारे कित्येक महाभाग माझ्या ओळखीचे आहेत. त्यामुळे खायला आवडतयं म्हणजे बनवतां आलंच पाहिजे ही जबाबदारी या प्रेमात नसते. टम्म फुगलेल्या फुलक्यांमध्ये प्रेम असतं. जेवणावर यथेच्छ आडवा हात मारल्या नंतर येणाऱ्या सोलकडी च्या शेवटच्या घोटात प्रेम असतं. शाळेत असताना पैसे साठवून तिच्या साठी घेतलेल्या चाॅकलेटमध्ये प्रेम असतं. हाॅटेलमध्ये आपल्या आवडी ऐवजी समोरच्याच्या आवडीची ऑर्डर देण्यात प्रेम असतं. तिच्या सोबत साजरा केलेल्या पहिल्या व्हॅलेंटाईन पासुन म्हातारपणी साजऱ्या केलेल्या लग्नाच्या वाढदिवसा पर्यंत जे वेळे सोबत मोठ होऊन पण लहान रहातं ते प्रेम असतं.खाऊ घालणाऱ्याच्या मनांत प्रेम असत आणि खाणाऱ्याच्या पोटात प्रेम असतं. कदाचित म्हणुनच प्रेमाचा मार्ग पोटातून जात असावा. नेमका हा मार्ग ज्याला सापडला तोच ह्रदया पर्यंत पोहोचु शकतो. कधी कधी प्रेम हे चहा आणि बन मस्क्या इतक हलकं फुलकं असतं. तर कधी कधी मसाले भाताइतकं खमंग आणि कित्येक दिवस मनांत रेंगाळत रहाणारं असतं.
प्रेमाची रेसिपी प्रत्येकाची वेगळी असते त्या मुळे डिश सेम असली तरी चव मात्र मुळीच सेम नसते, ही चव एकदा तरी चाखायला हवीच. आवडत असेल किंवा नसेल तरी this recipe is worth giving a try !
सोनचाफा
コメント