top of page
Search
vaibhavisamant001

जाहलो खरेच धन्य चाखतो मराठी..!!



अठरा पगड जाती जमाती, दर बारा मैलांवर बदलणारी भाषा हे जसं मराठी मुलखाचं वैशिष्टय आहे, तसंच प्रांतोप्रांती बदलणारी चव हे सुद्धा... पदार्थ एकाच नावाने ओळखला जात असला तरी त्याची चव मात्र प्रत्येक प्रांतात वेगळी असते. कोकणात पांढरी शुभ्र तांदळाची भाकरी आणि भरपुर खोबऱ्याचा किस घातलेला झुणका जिभेवर रेंगाळत रहातो, तेच सांगली किंवा साताऱ्याला गेलो तर झणझणीत झुणका, ज्वारी किंवा बाजरीची भाकरी आणि अगदी डोळ्यातुन पाणी येईल इतका अस्सल मिरचीचा ठेचा, दाण्याचं कुट घातलेली कोशिंबीर असा बेत असतो. दक्षिण महाराष्ट्रातलं थालीपीठ आणि उत्तर महाराष्ट्रातले धपाटे एकमेकांचे सख्खे भाऊ म्हणतां यावेत इतकं साम्य दाखवतात, तरी पट्टीचे खवय्ये एका घासात दोघांमधला फरक जोखतात.

अगदी जिऱ्याची फोडणी घातली आहे की मोहोरीची याने सुद्धा चवीत फार बदल होतो. तमालपत्र आणि गरम मसाल्याचा खमंगपणा मुरलेला मसालेभात असो किंवा साधा वाटाणे भात प्रत्येक पदार्थाला स्वत:ची अशी वेगळी ओळख असते. मी लहान असताना आजी कानिवले, आलेपाक, शिरवाळ्या असले बरेच पदार्थ बनवायची. माझ्या वर्गातल्या काही मैत्रिणींनी कधी कानिवले खाल्ले नाहीत या गोष्टीच त्या वयात मला आश्चर्य वाटायचं. किंवा माझ्या डब्यातल्या मेथीच्या भाजीत दाण्याच कुट नसतं याच माझ्या खानदेशी मैत्रिणीला नवल वाटायचं. पण एकमेकींचे डबे खाताना जे चांगलं लागायच ते सांगायला लागलो. माझ्या आग्रहामुळे आमच्या घरी पण बऱ्याच भाज्यांमध्ये खोबऱ्या ऐवजी दाण्याच कुट वापरायला सुरवात झाली. एका मैत्रिणीची आई घावणे कसे काढायचे हे शिकायला खास आमच्या घरी आलेली. मला लहानपणी पासुन सवयीचे असणारे घावणे तिला इतके का आवडले हे तेव्हा मला कळण शक्यच नव्हतं.

कोकणात प्रामुख्याने कुळीथ वापरतात जो महाराष्ट्रात इतर भागांत फारसा वापरला जात नाही. मेथकुट भात आणि रवाळ तुप हे काॅंम्बिनेशन फारच भन्नाट आहे. हल्ली आपण ताटात जेवतो पण पारंपरिक पद्धत बघतां पत्रावळी आणि केळीच्या पानांचा थाट वेगळाच होता. साधं सरबत घ्यायचं झालं तर काही ठिकाणी कोकमाच तर काही ठिकाणी लिंबाच प्रसिद्ध आहे. एकंदरीत भारतीय पाककला हा जागतिक संशोधनाचा विषय झाला यातच सगळ आलं पण तरीही लहानपणापासुन अंगी बाणलेली संस्कृती आणि जिभेचे पुरवले गेलेले चोचले बघतां प्रत्येक मराठी किंबहुना महाराष्ट्रात वाढलेल्या माणसाच्या मनाचा मोठ्ठा कोपरा हा मराठमोळ्या जेवणाने व्यापलेला असतो. आणि म्हणूनच गिरगांव कट्टा आहे समृद्ध मराठी भाषेसोबतच सुग्रास मराठमोळ्या जेवणाचे पोटभर आभार मानण्यासाठीचे हक्काचे ठिकाण… तर मग या आपल्या गिरगांव कट्ट्यावर आणि म्हणा, “जाहलो खरेच धन्य चाखतो मराठी..!!

: सोनचाफा.


80 views1 comment

Recent Posts

See All

1 Comment


Unknown member
Jan 09, 2022

Nice. do visit my blog - https://www.bedunechar.in

Like
bottom of page